नंदुरबार – काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेत होता. परंतु स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासींचा इतिहास त्यांच्या काळात कधीही देशातल्या जनतेसमोर आला नाही. ते काम आता मोदी सरकारमुळे होत असून देशाला आदिवासींचा गौरवशाली इतिहास माहीत होत आहे. असे असताना भोळ्या भाबड्या आदिवासी समाजाची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी पुन्हा सुरू केले आहे. जनजाती हा शब्द अपमानास्पद असल्याचे खोटे सांगून थेट आदिवासींच्या गौरव दिनाला ते विरोध करतात. आता गावागावातल्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी सुद्धा जागृत होऊन असे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवावी; अशा परखड शब्दात संसद रत्न माजी खा. डॉ. हिना गावित यांनी काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेसचे खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांचा खरपूस समाचार घेतला.
क्रांतीसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त जिल्हाभरात जनजाती गौरव सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा अर्थात जनजातीय गौरव दिवस व अभिवादन कार्यक्रम अक्कलकुवा येथे आज दि. १६ नोव्हेंबर 2026 रोजी माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख भाषणात त्या बोलत होत्या.
या भाषणात डॉक्टर हिनाताई म्हणाल्या की, ॲडवोकेट गोवाल पाडवी हे स्वतःला वकील म्हणवतात. परंतु ‘जनजाती’ हा शब्द संविधानात आहे, हेच त्यांना माहीत नाही. सर्व आदिवासी बंधूंनी हे समजून घ्यायला हवे की, मराठीत अनुसूचित जमाती म्हणतात आणि हिंदीमध्ये जनजाती म्हणतात. जनजाती हा शब्द संवैधानिक आहे. भारतीय जनता पार्टी किंवा अन्य कोणी हा शब्द आणलेला नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ संविधानातच अनुसूचित जमातीला म्हणजे शेड्युल ट्राईबला उद्देशून या शब्दाचा उल्लेख आहे. परंतु आपले राजकारण साध्य करण्यासाठी हे नेहमीच भोळ्या भाबड्या आदिवासी जनतेची दिशाभूल करून खोट्या गोष्टी डोक्यात घालत असतात. इतके वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने आदिवासींचा गौरव कधीच केला नाही ते आज मोदी सरकारमुळे घडत आहे. अनेक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा गौरवशाली इतिहास आहे. तो काँग्रेसने कधीच जनतेसमोर आणला नाही. आता विद्यमान स्थितीमध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासी शूरवीरांचा उल्लेख इतिहासामध्ये समाविष्ट केला जावा जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या अभ्यासायला मिळेल आणि जनजातीचे गौरवशाली योगदान पुढच्या पिढीला माहीत होईल; यासाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे; असे डॉक्टर हिनाताई म्हणाल्या. गोवाल पाडवी यांनी त्याला विरोध करण्यापेक्षा आदिवासींच्या विकासासाठी खासदार म्हणून तुम्ही कोणत्या योजना आणल्या, कोणकोणती कामे केली हे सांगायला पाहिजे; असाही टोला डॉक्टर हिनाताई गावित यांनी लगावला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागेश दादा पाडवी यांनी प्रस्तावना केली आणि जनजाती गौरव दिनाच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वसावे, प्रतापदादा वसावे, जगदीशदादा वळवी, विनोदभाऊ कामे यांनीही आदिवासींच्या गौरवार्थ मोदी सरकारने सुरू केलेल्या योजना आणि उपक्रमांचा अभिमान असल्याचे सांगून आदिवासींची दिशाभूल करण्याचे काँग्रेस नेत्यांनी चालवलेले षडयंत्र कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार मनोगतातून व्यक्त केला. राजमोहीचे जयमल पाडवी, भूपेंद्र पाडवी, अलीविहीरचे किसन नाईक, नवानगरचे नरेश पाडवी, रोशन पाडवी, अशोक राऊत, किशोर वळवी, एडवोकेट सुधीर पाडवी, भाबलपूरचे विजू पाडवी, दिलीप वसावे, कथूराम सैंदाणे, रायसिंगदादा आणि अन्य सरपंच उपसरपंच व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
