नंदुरबार – शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळावा म्हणून शासन कोट्यवधी रुपयांचे अनुदान खर्च करते, शेतकऱ्यांच्या नावाने युरियाचा कोटा निश्चित केला जातो, खतविक्रीसाठी मोबाईल ॲप आणि क्यूआर कोडची यंत्रणाही कार्यान्वित केली जाते; मात्र एवढी सारी यंत्रणा अस्तित्वात असतानाही शेतकऱ्यांच्या हक्काचा शेकडो टन अनुदानित युरिया काळ्या बाजारात पोहोचत असेल, तर या संपूर्ण व्यवस्थेचा उपयोग नेमका कोणासाठी? शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर होणारा युरिया प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचतो की मध्येच कुणाच्या घशात जातो? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण व्यवहारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेला कृषी विभाग नेमके करतो तरी काय? शहाद्यातून अवैधरीत्या वाहून नेला जाणारा युरियाचा कंटेनर जप्त झाल्यानंतर हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
कंटेनर जप्तीने काळ्या बाजाराचे धागेदोरे उघड होणार का?
शेतकऱ्यांच्या हक्काचा अनुदानित युरिया चोरबाजारात विक्रीसाठी अन्यत्र वळवण्याच्या संशयावरून १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी शहाद्यात मोठी कारवाई घडली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अवैधरीत्या वाहून नेला जाणारा युरियाचा मोठा साठा असलेला कंटेनर पकडण्यात आला. शहाद्यातून दोंडाईचा मार्गे निघालेला हा कंटेनर सोनगीर पोलिसांच्या मदतीने धुळे तालुक्यातील लामकानी चौफुलीवर जप्त करण्यात आला.
ही केवळ एका कंटेनरची जप्ती नाही, तर अनुदानित खतांच्या वितरण व्यवस्थेतील संभाव्य मोठ्या हेराफेरीकडे लक्ष वेधणारी घटना आहे. शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला युरिया नेमका कोणाच्या माध्यमातून, कोणत्या नोंदीवर आणि कोणत्या उद्देशाने जिल्ह्याबाहेर वळवला जात होता, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. या प्रकरणातील मालाचा स्रोत कोणता? त्याची विक्री कोणाच्या नावावर दाखवण्यात आली? वाहतुकीमागील सूत्रधार कोण? आणि या व्यवहारातून नेमका कोणाला आर्थिक लाभ मिळणार होता? या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय कारवाईला पूर्णत्व येणार नाही.
विशेष म्हणजे, ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ स्तरावरून दबाव येत असल्याची चर्चा आहे. त्यात तथ्य आहे की नाही, हे तपासातून स्पष्ट व्हावे; मात्र अशा चर्चांमुळे तपासाच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. शहादा-नंदुरबारपासून वरिष्ठ स्तरापर्यंत या व्यवहाराचे धागेदोरे पोहोचतात का, हे उघड करण्याची जबाबदारी आता तपास यंत्रणांची आहे. कंटेनर पकडला, प्रकरण नोंदवले आणि पुढे फाईल बंद केली, असे होता कामा नये. या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण, हे समोर आलेच पाहिजे.
अक्कलकुव्याचे प्रकरण
आज शहाद्यातील कंटेनर जप्तीची घटना समोर आली असताना, बरोबर वर्षभरापूर्वी अक्कलकुवा तालुक्यात घडलेल्या युरिया टंचाईच्या प्रकरणाची आठवण होणे अपरिहार्य आहे. बफर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात युरिया उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना चढ्या दराने युरिया खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या आरोपांमुळे जनआक्रोश निर्माण झाला होता.
त्यावेळी माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून कृषी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. सुमारे ६ हजार ८०० मेट्रिक टन युरियाचे वितरण नेमके कोणाला झाले, कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले आणि त्याचा हिशोब कुठे आहे, असे थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. अधिकाऱ्यांना उपलब्ध रेकॉर्ड सादर करण्यास भाग पाडत वितरण व्यवस्थेतील गंभीर विसंगती जनतेसमोर आणली होती. युरियाची हेराफेरी केल्याच्या संशयावरून शहाद्यातील मादभाई या बड्या व्यापाऱ्याचे नाव समोर आले परंतु प्रत्येक तालुक्यात असे मोठे कलाकार लपलेले आहेत. अक्कलकुवा, म्हसावद, खेड दिगर, खांडबारा, दोंडाईचा या ठिकाणची नावे सध्या चर्चेत आली आहेत. जे लोकांना माहित आहे ते अधिकाऱ्यांना कसे माहीत नाही? हा प्रश्न पडतो.
हजारो मेट्रिक टन युरियाच्या वितरणाचा हिशोबच स्पष्ट नसेल, तर त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात असूनही निष्क्रिय का राहिली, हा प्रश्न कालही उपस्थित होत होता आजही पुन्हा उपस्थित होत आहे.
३२ हजार ५०० मेट्रिक टनांचे आवंटन; मग युरिया जातो कुठे?
कृषी विभागाच्या आयुक्तालयाने नंदुरबार जिल्ह्याला रब्बी हंगामासाठी ३२ हजार ५०० मेट्रिक टन युरियाचे आवंटन दिले होते. उपलब्ध आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२६ अखेर १० हजार ३६६ मेट्रिक टन युरिया शिल्लक होता. नोव्हेंबर २०२६ अखेर आणखी ६ हजार ८८३ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला. अशा प्रकारे एकूण १७ हजार २४९ मेट्रिक टन युरिया उपलब्ध असून त्यापैकी ४ हजार ३८४ मेट्रिक टनांची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या आकडेवारीवरून धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी मिळून ५० हजार मेट्रिक टनांहून अधिक अनुदानित युरिया उपलब्ध करून दिला जात असल्याचे चित्र समोर येते. असे असताना, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा किती लाभ मिळतो, याचे उत्तर मात्र महत्त्वाचे आहे.
युरियाच्या एका बॅगची बाजारातील किंमत साधारण २ हजार ५०० ते २ हजार ६०० रुपये आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याला ती केवळ २६५ रुपयांत उपलब्ध होते. उर्वरित रक्कम शासन अनुदानाच्या स्वरूपात देते. म्हणजेच, शासन शेतकऱ्यांच्या शेतीचा उत्पादनखर्च कमी व्हावा म्हणून मोठा आर्थिक भार उचलते. मात्र हाच अनुदानित युरिया जर शेतकऱ्यांऐवजी काळाबाजार करणाऱ्यांच्या हातात पडत असेल, तर शासनाच्या अनुदानाचा मूळ उद्देशच धुळीस मिळतो.
माहितगारांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे वळवला जाणारा युरिया रासायनिक कारखान्यांकडे किंवा अन्य औद्योगिक वापरासाठी पोहोचवला जातो. शेतकऱ्यांना २६५ रुपयांत मिळणारी बॅग काळ्या बाजारात २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत विकली जात असल्याचे सांगितले जाते. अर्थात, या व्यवहारांचे स्वरूप, प्रमाण आणि त्यामागील व्यक्तींची भूमिका तपासातून सिद्ध होणे आवश्यक आहे. मात्र एवढ्या मोठ्या किंमत फरकामुळे अनुदानित युरियाच्या हेराफेरीतून किती मोठा आर्थिक लाभ मिळवता येऊ शकतो, याची कल्पना येते.
मोबाईल ॲप आणि क्यूआर कोड कागदावरच प्रभावी आहेत काय?
अनुदानित खतांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून खत खरेदीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्याने मोबाईलवर मागणी नोंदवायची, त्यानंतर मिळणारा क्यूआर कोड खत विक्रेत्याला दाखवायचा आणि संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीच्या प्रमाणात खताची विक्री करायची, अशी प्रक्रिया आहे. या व्यवस्थेमुळे खत कोणाला, किती आणि कोणत्या विक्रेत्याकडून दिले गेले, याची नोंद उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
मग एवढी आधुनिक यंत्रणा अस्तित्वात असताना शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया शेकडो टनांच्या प्रमाणात अवैध वाहतुकीद्वारे बाहेर कसा जातो? घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना किती युरिया पुरवला जातो? किरकोळ विक्रेत्यांनी तो नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर वितरित केला? त्या शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे? प्रत्यक्षात त्यांना किती युरिया मिळाला? आणि विक्रीच्या नोंदीतील प्रमाण व दुकानातील प्रत्यक्ष साठा यांची पडताळणी होते का? असे होत नसावे म्हणूनच हेराफेरी करण्याचे फावते आहे.
आणखी एक गंभीर बाब विक्रेता वर्तुळातून चर्चिली जात आहे. शहाद्यातील कंटेनर सोनगीर पोलिसांनी पकडण्याच्या काही तास आधीच शहाद्यातून सुमारे ४५ मेट्रिक टन युरिया भरलेला एक ट्रक जळगाव जिल्ह्यात पोहोचल्याचे बोलले जात आहे. या माहितीची अधिकृत पडताळणी होणे गरजेचे आहे. मात्र ही बाब खरी असल्यास संबंधित ट्रकचा माल कोणाचा होता, तो कोणत्या परवानगीने पाठवला गेला, त्याची विक्री कोणाच्या नावावर दाखवली गेली आणि त्याचा अंतिम वापर कुठे झाला, याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला; जबाबदारी निश्चित होणार कधी?
एकीकडे शेतकरी उत्पादनखर्चाच्या वाढत्या ओझ्याखाली दबलेला आहे. दुसरीकडे त्याला दिलासा देण्यासाठी शासन अनुदानावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. हे अनुदान जनतेने भरलेल्या विविध करांच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या सार्वजनिक निधीतून दिले जाते. त्यामुळे अनुदानित युरियाची हेराफेरी म्हणजे केवळ शेतकऱ्याच्या हक्कावर घाला नाही, तर सार्वजनिक पैशाचीही लूट आहे.
शेतकऱ्याला २६५ रुपयांत मिळायला हवा असलेला युरिया जर काळ्या बाजारात हजारो रुपयांना विकला जात असेल, तर त्यातून फायदा शेतकऱ्याला नव्हे, तर या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या घटकांना होत आहे. अशा प्रकारच्या हेराफेरीला खतपुरवठा साखळीतील काही घटकांचे सहकार्य मिळते का? विक्रीच्या नोंदींमध्ये फेरफार होतो का? प्रत्यक्ष साठा आणि कागदोपत्री साठा यांत तफावत आहे का? आणि या सर्वांवर देखरेख ठेवणारे अधिकारी आपली जबाबदारी पार पाडतात का? या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे शोधली गेली पाहिजेत.
कृषी विभाग म्हणतो, कारवाई सुरूच राहणार!
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी हडपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कंटेनर जप्तीची कारवाई कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळेच शक्य झाली. कृषी विभागाने स्वतः दखल घेऊन ही कारवाई घडवून आणली आहे. अनुदानित युरिया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, ही आमचीदेखील भूमिका आहे. काळाबाजार करणाऱ्या कोणालाही क्षमा केली जाणार नाही. अशा प्रकारांविरोधात आमची कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची ही भूमिका स्वागतार्ह असली, तरी आता केवळ कारवाईची घोषणा पुरेशी ठरणार नाही. कंटेनरमध्ये सापडलेल्या युरियाचा मूळ स्रोत, त्याच्या वाहतुकीमागील सूत्रधार, संबंधित घाऊक व किरकोळ विक्रेत्यांच्या नोंदी आणि या व्यवहारातून लाभ मिळवणारे घटक यांचा छडा लागणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया गायब करणारे हात नेमके कोणाचे आहेत, आणि त्या हातांपर्यंत पोहोचण्याची हिंमत तपास यंत्रणा दाखवणार आहे का? हे स्पष्ट होणे लोकांना अपेक्षित आहे.